रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट ! अकादमी
मुंबई , दि . १ फेब्रुवारी २०२१ :- क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक असून , यासंदर्भात कुलकर्णी यांनी आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना . अशोक चव्हाण यांची भेट घेऊन विचारविनिमय केला . सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व ' क्रिककिंगडम'चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर ना . चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली . नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून , ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल , अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली . कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली . कुलकर्णी व दहिवल यांनी या भेटीची आठवण म्हणून ना . अशोक चव्हाण यांना एक टी - शर्ट भेट दिले . या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे .

Good
ReplyDelete