कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध ; मुख्यमंत्री

  वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध ; मुख्यमंत्री 


                                                                              मुंबई:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या कोरोनाची साखळी तोडायची असेल  तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख  मुख्य सचिव सीताराम कुंटे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव विकास खारगे, मदत आणि पुनर्वसन सचिव असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह डायमंड असोसिएशनचे पदाधिकारी सर्वश्री. कोलिन शहा, सुरेंद्र दासानी, अनुप मेहता, मेहूल शहा, रमणिक शहा, राहूल ढोलकिया, किरीट बन्साली रसेल मेहता, अरूण शहा, सब्यास्याची  रे, चिराग लाखी, अरविंद संघवी, दिनेश लखानी, संजय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल डायमंड असोसिएशनला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, संकटाची चिंता नाही पण या संकटाला सामोरे जाताना सहकार्य करणाऱ्या मित्रांची नक्कीच गरज आहे. कोरोनाचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि व्यापार करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. आपल्या सर्वच कामगारांना एकाच शिफ्टमध्ये न बोलवता ज्यांना घरी राहून काम करणे शक्य आहे त्यांना ते करू दिले पाहिजे, ज्यांना कारखान्याच्या आवारात यायचे त्यांच्या शिफ्ट ड्युट्या लावल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

 कोरोनाची आज दुसरी लाट आहे, उद्या कदाचित तिसरी येईल. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल  तर काही कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क व्यवस्थित लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि दो गज की दूरी राखणे आवश्यक आहे. ज्या कारखानदारांना त्यांच्या कारखान्याच्या जागेत काही कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे त्यांनी कारखान्याच्या आवारातच कामगारांची  राहण्याची व्यवस्था करावी, त्यांचे टेस्टिंग, लसीकरण याकडे लक्ष दिले जावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यात फेब्रुवारी २०२१ पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती परंतु कोरोनाचा नवा विषाणू असा आहे जो वेगाने पसरतो. त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आजही ७५ ते ८० टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यांना त्रासही होत नाही परंतु ते इतरांना बाधित करू शकतात, कोरोनाचा प्रसार करू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने स्टॅम्प ड्युटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचाही शासन गांभीर्याने ‍विचार करेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान