महाविकास आघाडीचा महाविजय! नांदेड जिल्हा बॅंकेतूनही चिखलीकर पॅनेलचा सफाया मुखेड मद्दे कार्यकर्ताचे जलोश
महाविकास आघाडीचा महाविजय!
नांदेड जिल्हा बॅंकेतूनही चिखलीकर पॅनेलचा सफाया
काँग्रेस १२, राष्ट्रवादी ४, शिवसेना १
नांदेड, दि ४:-
काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनेच्या महाविकास आघाडीद्वारे पुरस्कृत समर्थ सहकार पॅनेलने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली असून, महाविकास आघाडीचा महाविजय झाला आहे. या निवडणुकीत चिखलीकरांच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडाला. त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील समर्थ सहकार पॅनेलने २१ पैकी तब्बल १७ जागांवर दणदणीत विजय संपादन केला. महाविकास आघाडीच्या १७ विजयी संचालकांमध्ये काँग्रेस पक्षाचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. जिल्हा बँकेत एकटया काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमताइतके संचालक निवडून आणले असून, राष्ट्रवादी व शिवसेनाही सोबत असल्याने महाविकास आघाडी अधिक बळकट झाली आहे.
काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण, मुखेडचे माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जि.प.चे कृषी व पशू संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, नांदेड बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव कोंढेकर, विजयसिंह देशमुख, राजेंद्र केशवे, विजयाबाई देवराव शिंदे, सौ. संगिता राजेश्वर पावडे, शिवराम लुटे, सविता रामचंद्र मुसळे, श्याम देविदास कदम यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहीफळे व व्यंकटराव जाळणे यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे हदगावमधून बिनविरोध निवडून आले होते.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये महाविकास आघाडी प्रणीत समर्थ सहकार पॅनेल विरुध्द खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या सहकार विकास पॅनेलमध्ये लढत झाली. या लढतीमध्ये सहकार विकास पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडाला. केवळ स्वतः खा. प्रताप पाटील चिखलीकर (लोहा), प्रवीण पाटील चिखलीकर (कंधार) व कैलास गोरठेकर (उमरी) हे तिघे या पॅनेलचे विजयी उमेदवार ठरले आहेत. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. चिखलीकर पिता-पुत्रांनी केवळ स्वतःच्याच विजयाकडे लक्ष दिल्याने भाजपमध्ये नाराजीचा तीव्र सूर उमटला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नावाचा वापर करुन खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी सहकार विकास पॅनेल निवडणूक रिंगणात उतरवले. मात्र या पॅनेलमध्ये भाजपच्या निष्ठावंतांऐवजी चिखलीकर समर्थकांचाच मोठा भरणा होता. यामुळे खा. चिखलीकर यांच्याविषयी भाजपमध्ये असंतोष निर्माण झालेला दिसून येत आहे. निष्ठावंताना डावलून उपर्यांना सोबत घेऊन निवडणूक लढविल्यानेच पराभवाला सामोरे जावे लागले, अशी कुजबूज भाजपच्या निष्ठावंत घटकांमध्ये सुरू आहे.

Comments
Post a Comment