रेतीचा अवैध साठा रिकाम्या जागेवर असल्यास जागा मालकांवरही गुन्हे होतील दाखल :- जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर
नांदेड:- जिल्ह्यातील गोदावरी पात्र व इतर नदी क्षेत्रातील अवैधरित्या होणाऱ्या रेती उत्खननाला आळा बसण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तराफे उध्दस्त करण्यासमवेत रेतीचे वाहने जप्त केली जात आहेत . अवैध रेती उत्खननाला आळा बसावा यासाठी आता आम्ही अधिक कठोर पावले उचलत असून नांदेड महानगर पालिका , जिल्ह्यातील नगर परिषदा व ग्राम पंचायतीच्या हद्दीत जिथे कुठे मोठया प्रमाणावर वाळू साठा उपलब्ध असेल तो जिल्हा प्रशासनातर्फे जागच्या जागीच जप्त करुन जाच्या मालकीची ती जागा / प्लॉट आहे त्या प्लॉटधारकाविरुध्द गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आज दिला . त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अवैध रेती उत्खनाना बद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक संपन्न झाली . या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे , मनपा आयुक्त डॉ . सुनिल लहाने , अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी , उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी , तहसिलदार किरण अंबेकर उपस्थित होते . सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी , तहसिलदार यांनी या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला . रेतीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता ज्या नागरिकांनी बांधकासाठी रेती घेवून ठेवलेली आहे . त्यांनी रेतीच्या पावत्या तपासणी पथकाला दाखवाव्यात . रेतीच्या पावत्या देणे हे कायद्याने बंधनकारक असून अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी महसुलच्या पथकांना जनतेने सहकार्य करावे असेही जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले .

Comments
Post a Comment