SFI नांदेड शहर कमिटी च्यावतीने प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांना आदरांजली
नांदेड:-
एसएफआयचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांना SFI नांदेड शहर कमिटी च्यावतीने आदरांजली देत क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले.
एसएफआयचे संस्थापक राज्य अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे सर यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी काल कळाली त्यांच्या निधनामुळे चळवळीला सतत दिशा देणारे मार्गदर्शक आपण गमावले आहे.
१९७० साली मोरे सर यांनी तिरुअनंतपुरम येथे झालेल्या एसएफआयच्या स्थापना अधिवेशनात महाराष्ट्रातील प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. तेथून परत आल्यावर मराठवाड्यात विद्यार्थ्यांना संघटित करून जबरदस्त आंदोलन उभारले. मराठवाडा विकास आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ साली उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे झालेल्या महाराष्ट्र एसएफआयच्या पहिल्या राज्य अधिवेशनात ते पहिले राज्य अध्यक्ष म्हणून निवडले गेले. आणि त्यानंतर त्यांनी एसएफआयला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मनात घर करून दिले. त्यांच्याच प्रयत्नातून आणि सहकार्यातून ९ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईत आदर्श विद्यालयामध्ये एसएफआयच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आजी-माजी कार्यकर्त्यांचा मेळावा यशस्वी झाला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेच होते. ते डीवायएफआय या आपल्या भतृभावी युवक संघटनेचे देखील संस्थापक राज्य अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी प्राध्यापक संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेचे कार्य केले.
वाशी येथील महाविद्यालयात प्राध्यापक आणि रेणापूर व किल्लारी येथील महाविद्यालयात ते प्राचार्य होते. हा सर्व व्याप त्यांच्यामागे असताना त्यांनी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे शहीद भगतसिंग महाविद्यालय स्थापन केले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. तसेच राज्यशास्त्र विभाग अभ्यासक्रम मंडळावर देखील ते होते. त्यांनी विद्यार्थी दशेपासून सुरू केलेले कार्य आजतागायत सुरूच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने आपले खूप नुकसान झाले आहे. एक अभ्यासू व चिकित्सक मार्गदर्शक, लढाऊ नेते, पुरोगामी, मार्क्सवादी, धर्मनिरपेक्ष विचारवंत आपण गमावला आहे.
शहराध्यक्ष स्वप्निल बुक्तरे, सचिव शंकर बादावाड, शहर उपाध्यक्ष भक्ती ठाकूर, जिल्हा सचिव मंडळ सदस्य रत्नदीप कांबळे, शहर संघटक प्रथम तारू, शहर कमिटी सदस्य गुणरत्न सदावर्ते, रोहीत त्रिभुवन, शंकर जाधव,पवन सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. तर यावेळी राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड व सहसचिव सचिन खडके यांची उपस्थिती होती.
शेवटी अभिवादन सभेचे समारोप शहराध्यक्ष स्वप्निल बुक्तरे यांनी केले

Comments
Post a Comment