काँग्रेसने दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार
राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणारविधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेत पुढचं पाऊल टाकलं आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवारही जाहीर केला,
मुंबई दि10 मे : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेत पुढचं पाऊल टाकलं आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवारही जाहीर केला आहे. विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेसने राजेश राठोड आणि राज किशोर मोदी या दोघांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची घोषणा केली.
काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात असताना, काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसही 2 जागा लढणार आहेत.
दुसरीकडे भाजपने संख्याबळानुसार 4 जागांवर दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीने सहावा उमेदवार दिल्याने, भाजपही आणखी एक उमेदवार देऊ शकतो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
विधानपरिषदेत भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस 3 , काँग्रेस 2 आणि शिवसेनेचे 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. आता संख्याबळानुसार यंदा निवडणुकीत निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. आता काँग्रेसनेही उमेदवार जाहीर करुन, राष्ट्रवादीच्या पुढे पाऊल टाकलं आहे. राष्ट्रवादीने अद्याप अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील 162 इच्छुकांची यादी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली होती. यापैकी पुण्याचे मोहन जोशी, यवतमाळचे माणिकराव ठाकरे, वर्धाच्या चारुतला टोकस, नागपूरचे प्रफुल गुदडे पाटील, आशिष देशमुख या नेत्यांची नावे चर्चेत होती.
भाजपने 4 जागांवर उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी देऊन अर्ज भरले आहेत.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या निवडणुकीत मुख्यमंत्री उमेदवार असतात ती बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. मात्र आता काँग्रेसने वाढीव जागा मागितल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
9 रिक्त जागांसाठी निवडणूक, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे – शिवसेना
निलम गोऱ्हे – शिवसेना
राजेश राठोड – काँग्रेस
राजकिशोर मोदी – काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप
गोपीचंद पडळकर – भाजप
प्रवीण दटके – भाजप
डॉ. अजित गोपछेडे – भाजप
कुणाचं संख्याबळ काय?
सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment